अहिल्यानगरशहरातील इतिहास प्रेमी, विविध संघटना आणि महापालिकेतील विरोधी पक्ष यांचा तीव्र विरोध असतानाही माळीवाडा येथील वेस पाडण्याची मागणी आज सत्ताधारी नगरसेवकांनी केली. यासाठी दिलेल्या निवेदनावर ५७ नगरसेवकांच्या सह्या आहेत.
माळीवाडा येथे फुले दाम्पत्य यांचे भव्य स्मारक करण्यासाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र फुले दाम्पत्य स्मारक समितीने मध्यंतरी महापालिकेला दिले होते. महापालिकेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर शहरातील इतिहास प्रेमींनी या विरोधात एकवटत वेस पाडण्यास विरोध दर्शवला.माळीवाडा वेस हा ऐतिहासिक ठेवा असल्याचा दावा करत ती पाडण्यास विरोध दर्शविण्यात आला.
त्या पाठोपाठ काही संघटनांनीही यास पाठिंबा देत माळीवाडा वेसचे जतन करण्याची मागणी केली. शिवसेना नगरसेवकांनीही वेस पाडण्यास विरोध करत पुरातत्त्व खात्याला पत्र देऊन माळीवाडा वेशीचे जतन करण्याची मागणी केली होती. पुरातत्त्व विभागानेही एका पत्राद्वारे वेशीचे संरक्षण आणि जतन करण्याचे सांगितले होते. या सर्व प्रकारामुळे महापालिकेने माळीवाडा वेस पाडण्याची भूमिका सौम्य केली होती. मात्र आज सत्ताधारी ५७ नगरसेवकांनी महापौरांना निवेदन देत माळीवाडा वेस पाडण्याच्या फुले दाम्पत्य स्मारक समितीच्या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे.
माळीवाडा वेस चारशे वर्षांपूर्वीची असून तिची पडझड झालेली आहे. फुले दाम्पत्याच्या स्मारकासाठी जागा कमी पडत असल्याने माळीवाडा वेस पाडावी. तेथे आकर्षक विद्युत रोषणाई, सुशोभीकरण आणि जागेला संरक्षक भिंत घालावी. या परिसरात येणाऱ्या पाचही रस्त्यावरून हे स्मारक दिसेल, असे करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
सिटीसर्वेवरून सावेडीच्या नगरसेवकांचा संतापमहापालिकेच्या यंदाच्या बजेटवर महासभेत आज चर्चा सुरू झाली. सावेडीच्या सिटी सर्वेच्या मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामावर सावेडीतील नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. याबाबत फेर प्रस्ताव पाठवून महिनाभरात या विषयावर महासभा घेण्याची ग्वाही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
सभा बजेटची, चर्चा कुत्र्यांचीआजची सभा अंदाजपत्रकीय होती. त्यामुळे सभेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा अपेक्षित होते. मात्र दैनंदीन समस्यांवर चर्चा करण्यातच सभेत वेळ घालवला गेला. मोकाट कुत्र्यांचा विषय उपस्थित करत त्यावर बराचवेळ खल झाला. अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होऊच शकली नाही. त्यामुळे महापौर ज्योतीताई गाडे यांनी आजची सभा तहकूब करून आता उद्या घेऊन अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.












