शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे मागील काही वर्षात आयटी हब आणि औद्योगिक उद्योगांचे केंद्र बनले आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कर्मचारी पुण्यात येत आहेत आणि इथेच वास्तव करत आहेत.
साहजिकच पुण्याच्या विकासालाही मागील काही वर्षात चार चांद लागले आहेत. अनेक रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या सुविधांमुळे पुण्यात राहणे, आणि इथे काम करणे सोप्प झालं आहे. आता पुण्याच्या याच विकासाला आता बुलेट ट्रेनची जोड मिळणार आहे. होय, पुणे शहराला केंद्रातील मोदी सरकारकडून २ बुलेट ट्रेनच मोठं गिफ्ट मिळालं आहे.
पुणे ते मुंबई आणि पुणे ते हैदराबाद अशा या दोन्ही बुलेट ट्रेनचा (Pune Bullet Trains) मार्ग असेल. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन सुरू झाल्यामुळे या प्रवासाचा कालावधी कमी होऊन तो केवळ ४८ मिनिटांवर येईल. महाष्ट्रातील हि दोन आघाडीची शहरे बुलेट ट्रेनने जोडली गेल्यास वाहतूक आणि दळणवळण सोप्प होईल. तसेच दोन्ही शहराच्या आद्योगिक विकास आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
याशिवाय नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन तो साधारणपणे दोन तासांपर्यंत येईल. तसेच या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमधील संबंध अधिक दृढ होतील. हा बुलेट ट्रेन प्रकल्प नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) आणि औद्योगिक क्षेत्रांनाही मोठी चालना मिळेल.
Pune Bullet Trainsफक्त पुणे ते मुंबई आणि पुणे ते हैद्राबादच नव्हे तर देशात तब्बल ७ बुलेट ट्रेन सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन आहे. यामध्ये मुंबई – पुणे, पुणे -हैदराबाद,चेन्नई- हैदराबाद, चेन्नई – बेंगलुरु, दिल्ली – वाराणसी, बंगळुरू- हैद्राबाद, वाराणसी – सिलीगुड़ी या मार्गाचा समावेश आहे.
बुलेट ट्रेनचे हे जाळे या शहरातील प्रवासी कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना देईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षण, उद्योग आणि नोकरी करणाऱ्यांना या बुलेट ट्रेनचा मोठा फायदा होणार असून दळणवळणाला सुद्धा मोठा वेग येणार आहे.












