पुण्यातील शांत समजल्या जाणाऱ्या नऱ्हे गाव परिसरात एक धक्कादायक वास्तव समोर आलं, जे बाहेरून ‘स्वर्ग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लॉजच्या आड सुरू होतं.झील कॉलेजजवळील “स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज”मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्याने या भागात खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला काही दिवसांपासून या लॉजबाबत संशयास्पद हालचालींची माहिती मिळत होती. या ठिकाणी महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत शिताफीने कारवाईची योजना आखली.
पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली. व्यवहार निश्चित झाल्यानंतर सिग्नल मिळताच पथकाने अचानक लॉजवर धाड टाकली. या वेळी आत सुरू असलेला घाणेरडा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ चार महिलांची सुटका करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
तिघांना अटक, पोलिसांकडून कठोर कारवाईया प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अभिषेक दिलीप गवळी (रा. खेड शिवापूर), रामू सांडू देवकर (रा. सिंहगडरोड) आणि महेश गणेश नागने (रा. न-हे गाव) अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात हे तिघेही या रॅकेटशी थेट संबंधित असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या रॅकेटमागे आणखी कोणी मोठे जाळे कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शिक्षण संस्थांच्या जवळ अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना समुपदेशनाची मदत दिली जात आहे. पोलिसांकडूनया प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












