पुण्यात झालेल्या महाराष्ट्र नास्तिक मेळाव्यात डॉ. मुग्धा कर्णिक यांनी संत परंपरा आणि श्री विठ्ठल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती (आळंदी देवस्थान) यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
यासंदर्भात सोमवारी (ता. ६) देवस्थानतर्फे अधिकृत निषेध पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.देवस्थानाने आपल्या पत्रकात नमूद केले आहे की, डॉ. कर्णिक यांनी धर्म, पंथ आणि संस्कृती याबाबत आक्षेपार्ह आणि विडंबनात्मक स्वरूपाचे वक्तव्य केले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा उल्लेखही विडंबनात्मक पद्धतीने केला.
महाराष्ट्राचे लोकदैवत श्री विठ्ठल तसेच वारी परंपरा या कालबाह्य असल्याचे विधान केले. या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभही वारकरी परंपरेच्या मूल्यांमुळेच समाजात निर्माण झाला आहे, याची जाणीव संबंधित वक्त्यांनी ठेवावी.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी तेराव्या शतकात स्त्रियांना गुरुपद देऊन सामाजिक समतेचा पाया घातला. गेली सुमारे ७५० वर्षे वारकरी परंपरेने समाजात समानता, बंधुता आणि एकात्मता जपली आहे.संत तुकाराम महाराजांच्या ‘या रे या रे लहान थोर, याती भलते नारी नर’ या अभंगाचा दाखला देत, सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य संत परंपरेने केले. काही व्यक्ती पुरेसा अभ्यास न करता बेताल वक्तव्य करून सवंग प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात, अशी टीकाही पत्रकातून करण्यात आली आहे.
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सकल संत आणि श्री विठ्ठल यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी आळंदी देवस्थानाने केली आहे.या निषेध पत्रकावर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.













