आपल्या १८ वर्षीय मुलाचा ‘हिट-अँड-रन’मध्ये मृत्यू झाल्यानंतर डेहराडूनमधील एकल मातेने या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्यास पोलिसांना भाग पाडले.
या प्रकरणाचा तपास यापूर्वीच थांबवण्यात आला होता.अंतिम अहवालात “अज्ञात चालकाचा शोध लागला नाही” असं नमूद करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरच्या १८ महिन्यांत या माऊलीने स्वतःच पुरावे गोळा करण्याचं काम केलं. पुरावे गोळा करुन तिने पोलिसांना आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्यास भाग पाडले.
उत्तराखंडमधील डेहराडून येथे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.काय आहे प्रकरण?क्षितिज चौधरी याचा मृत्यू १६ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला होता. अगदी त्याची ‘यूपी पोलीस’ प्रवेश परीक्षेच्या आदल्याच दिवशी. प्रेम नगर परिसरात एका ट्रकने त्याला मागून धडक दिली आणि त्यानंतर तो ट्रक चालक पळून गेला.
क्षितिजची ४३ वर्षीय आई ललिता चौधरी व्यवसायाने ब्युटीशियन आहे. तिने आपल्या दोन मुलांचा एकटीनेच सांभाळ केला होता. तिने सांगितले की, मदत मिळेपर्यंत तिचा मुलगा ४५ मिनिटे रस्त्यावरच तडफडत पडला होता. पाय कापून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
आईची भावनिक प्रतिक्रिया”माझ्या मुलाला रस्त्यावरच मरण्यासाठी सोडून देण्यात आले. ४५ मिनिटं कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. वाहनाची धडक बसल्यानंतर एखाद्या बेवारस प्राण्याप्रमाणेच त्याचा मृत्यू झाला” असं तिने व्यथित होऊन सांगितलं.
पोलीस म्हणाले, जादूची कांडी नाही१९ फेब्रुवारी २०२४ रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर, ललिता यांनी सांगितलं की पोलिसांच्या तपासात फारशी प्रगती झाली नाही. “मला सांगण्यात आलं की, त्यांच्याकडे काही जादूची कांडी नाही” त्यामुळे त्यांनी स्वतःच या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले.२७ फेब्रुवारीपासून तिने सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली.
सप्टेंबर २०२५ मध्ये ‘अंतिम अहवाल’ दाखल होणं हा तिला अडथळा ठरला नाही. अखेरीस तिने तो ट्रक, त्याचा मालक आणि चालकाचा शोध लावला.डेहराडूनमधील एका आंदोलनादरम्यान तिची शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी भेट झाली आणि तिथेच या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. यानंतर एसएसपी प्रमेंद्र डोबाल यांनी प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.












