शहरातील पथारी व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला शिस्तबद्ध व कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मा. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.शहरातील सर्व पथारी व्यवसायिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.
यासोबतच प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांना अधिकृत परवाना (लायसन्स) प्रदान करण्यात येईल. या बारकोडमध्ये संबंधित व्यवसायिकाची संपूर्ण माहिती, व्यवसायाचा प्रकार व परवानगीची जागा यांचा समावेश असेल.
या उपक्रमामुळे अनधिकृत पथारी व्यवसायावर नियंत्रण येऊन अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण मिळणार आहे, तसेच शहरातील व्यवस्थापन अधिक सुसूत्र होण्यास मदत होणार आहे.
तसेच, पथारी व्यवसायिकांच्या संघटनेने महानगरपालिकेस लेखी अनूमोदन देत पुढील बाबींची हमी दिली आहे की, ते रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, स्वच्छता राखतील, महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करतील तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतील.
मा. महापौर महोदयांनी संबंधित सर्व विभागांना या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, या माध्यमातून शहरातील पथारी व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व नियमनबद्ध करण्याचा उद्देश आहे.












