अशोक खरात प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी आमच्या बनावट कागदपत्राद्वारे त्यांनी पतसंस्थेत खाती काढल्याचा दावा करून अशोक खरात याच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले.
चाकणकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी प्रतिभा चाकणकर यांचे खरातबरोबर झालेले कॉल आणि मेसेज याबद्दलची कुंडलीच काढली आहे.
प्रतिभा चाकणकर यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ऐकली. त्यावेळी काही लोक किती खोटं बोलतात, हे लक्षात आलं. याच प्रतिभा चाकणकर यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते २३६ आहेत. खरात अनेकदा प्रतिभा चाकणकर यांना फोन करीत असे. तसेच २१८ एसएमएस दोघांमध्ये झालेले आहेत. त्यातील अनेक मेसेज प्रतिभा चाकणकरांनी सकाळी सहा ते नऊ वेळेत खरातांना पाठवले आहेत.
खरे तर मला मुलांबद्दल बोलायला आवडत नाही. परंतु आज प्रतिभा चाकणकर यांच्याबरोबर त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर देखील गेला होता. त्याच्याही मोबाईलवरून खरातला ३७ कॉल मेसेज गेले आहेत. त्यामुळे हे सगळे सांगतायेत की आमचे काहीही नाही, हे धादांत खोटे आहे.दुसरी गोष्ट म्हणजे अॅड जयश्री काळे पालवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत पाठवले होते की काय, माहिती नाही.
जयश्री काळे या आज चाकणकर यांच्या वकील म्हणून त्यांच्यासोबत गेल्या होत्या. एका आयोगावर त्या सदस्या आहेत. आयोगावरील सदस्या असल्या कारणाने खासगी वकिली करू नये, असा नियम आहे. परंतु तो नियम पायदळी तुडवून जयश्री काळे चाकणकरांच्या वकील म्हणून त्यांच्यासोबत गेल्या.
पतसंस्थेत काढलेली खाती आणि त्यावरून झालेले कोट्यवधींचे व्यवहार याप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी प्रतिभा चाकणकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पोलिसांनी तब्बल आठ तास प्रतिभा चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.












