काल १२ एप्रिल रोजी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. तब्बल ७० वर्षे आशाजींचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा होता. त्यांनी ज्या पद्धतीने गाणी गायिली, तिथे पोहचणं त्या काळात कोणत्याही गायिकेला शक्य झालं नाही.
आशाजींनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली. अखेर त्यांचा हा अप्रतिम प्रवास संपला आहे. आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शायकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र, ज्या आवाजाने अनेक हिरोईन्सचे करिअर घडवले, ज्यांच्या सुरांनी सिनेसृष्टीला जागतिक ओळख दिली, त्यांच्या शेवटच्या प्रवासात चित्रपटसृष्टीने दाखवलेली उदासीनता पाहून चाहत्यांना राग अनावर झाला आहे.
सोशल मीडियावर ढाळले अश्रू, पण प्रत्यक्षात फिरवली पाठआशा ताईंच्या निधनानंतर सोशल मीडियावर दु:खाचा महापूर आला होता. फेसबुक, इंस्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहून ‘माझे नुकसान झाले’, ‘एक युग संपले’ अशा आशयाचे मेसेज फिरत होते. मात्र, प्रत्यक्षात शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत यापैकी मोजकेच चेहरे दिसले. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या ए-लिस्ट सेलिब्रिटींची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली.
या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केला जात आहे की, आजकाल एखाद्या महान कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजे केवळ एक ट्वीट किंवा पोस्ट करणे एवढेच उरले आहे का?आशाजींना आज अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडच्या मोजक्याच चेहऱ्यांनी हजेरी लावली.
यामध्ये आमिर खान, विकी कौशल, रणवीर सिंग, रितेश देशमुख, सुदेश भोसले, शान, तबु, अनु मलिक, जावेद अख्तर इत्यादी कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, बॉलिवूडची मोठी नावं असलेल्यांपैकी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, सोनू निगम, हेमा मालिनी आदींनी आशाजींच्या अंत्यसंस्काराला पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.
बॉलिवूडमधील पोकळपणा चव्हाट्यावरआशा ताईंच्या आवाजाशिवाय हेलन यांचे डान्स नंबर अपूर्ण होते. रेखा यांच्या अदा, झीनत अमान यांचे ग्लॅमर, माधुरी दीक्षितची एनर्जी किंवा करिश्मा आणि करीना कपूर यांची स्टाईल; या सर्वांच्या यशात आशा ताईंच्या प्लेबॅक सिंगिंगचा मोठा वाटा आहे. मात्र, या मोठ्या नावांपैकी केवळ हेलन या संपूर्ण वेळ भोसले कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.
अंत्यसंस्काराच्या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार, संगीतकार आणि गीतकार उपस्थित होते. आपल्या गुरुला शेवटची आदरांजली देण्यासाठी ते आले होते. पण, ज्या ए-लिस्ट स्टार्सनी आशाताईंच्या नावावर प्रसिद्धी मिळवली, ते मात्र गायब होते. आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकेचा शेवटचा प्रवास हा केवळ एक सोहळा नव्हता, तर तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण होता. पण, यावेळी सिनेसृष्टीतील पोकळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.












