प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले शहराचे मध्यवर्ती बसस्थानक सुरक्षित ठिकाण आहे, अशी अपेक्षा असते. मात्र, वास्तवात चित्र उलट आहे. दिवसभर गजबजलेले हे बसस्थानक जसे-जसे संध्याकाळच्या अंधारात झाकले जाते, तसे इथले वातावरणच बदलून जाते.
शिस्त, नियंत्रण आणि सुरक्षा या शब्दांचा मागमूसही दिसत नाही आणि बसस्थानक हळूहळू अराजकतेच्या अड्ड्यात रूपांतरित होत असल्याचे चित्र आहे.रात्री नऊनंतर बसस्थानक परिसरात पाऊल टाकताच परिस्थितीची तीव्रता जाणवते. बसची वाट पाहणारे प्रवासी एका बाजूला थांबलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला मद्यधुंद व्यक्तींचे टोळके फिरताना दिसतात.
कोणालाही धक्का देणे, मोठ्याने शिवीगाळ करणे, प्रवाशांना त्रास देणे हे रोजचेच झाले आहे. विशेषतः महिलांसाठी ही परिस्थिती अधिकच अस्वस्थ करणारी आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जबाबदारी नेमकी कोणाची? बसस्थानक प्रशासन, सुरक्षा यंत्रणा की पोलिस विभाग? हे विभाग आपापली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतात.मात्र, याचा फटका प्रवाशांना बसतो.
सीसीटीव्ही बसविले म्हणजे सुरक्षा असे होत नाही, त्यावर लक्ष ठेवणारे आणि तत्काळ कारवाई करणारे कर्मचारी हवेत, रात्रीच्या वेळेस पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांची आहे.
मध्यवर्ती बसस्थानक हे शहराचे प्रमुख प्रवेशद्वार आहे.बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर याच ठिकाणाचा पहिला ठसा उमटतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हा ठसा अत्यंत नकारात्मक ठरत आहे. तातडीने पावले उचलली नाहीत, तर ही अराजकता आणखी वाढून मोठ्या घटनेचे कारण ठरू शकते.












