कात्रज चौक भाजी मंडई परिसरात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर पाऊल
पुणे प्रतिनिधी
पुणे शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून विशेष कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणे तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा धोकादायक प्रकारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करत नियमभंग करणाऱ्यांना चांगलाच दंड ठोठावला.
कात्रज चौक भाजी मंडई येथे आंबेगाव पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या कारवाईत पीएसआय दोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल गंगावणे, हेड कॉन्स्टेबल मंगेश खेडेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. या पथकाने रस्त्यावर उतरून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नागरिकांना सूचना दिल्या तसेच नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली.
विशेषतः ट्रिपल सीट बसून प्रवास करणारे तरुण तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे चालक हे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.











