वाई, दि. 20 एप्रिल 2026 — वाई नगर परिषदेकडून दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत आश्वासनांची आणि सकारात्मक चर्चेची नवी दिशा मिळाली. नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिलजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शहरातील शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या 5 टक्के कल्याण निधी लवकरच संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी, समस्या आणि त्यांच्या हक्कांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघर्ष दिव्यांग संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाजीगरभाई इनामदार यांनी शहरातील दिव्यांगांच्या रोजगाराच्या संधी तसेच काही शासकीय कामांबाबत ठोस प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे, बाजीगरभाई इनामदार हे नेहमीच संपूर्ण सातारा जिल्ह्यात दिव्यांगांच्या मदतीसाठी तत्पर असतात व त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतात, याची उपस्थितांनी दखल घेतली.
त्यावर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी “प्रथम नागरिक म्हणून तसेच प्रशासनाच्या वतीने दिव्यांगांच्या सर्व प्रश्नांना प्रामाणिकपणे न्याय दिला जाईल,” अशी ग्वाही दिली.
या आश्वासनानंतर उपस्थित दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला. बैठकीस संघर्ष दिव्यांग संस्थेचे विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत भोसले, वाई तालुका अध्यक्ष अजित जायगुडे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी संघर्ष दिव्यांग संस्थेचे जिल्हाध्यक्ष बाजीगरभाई इनामदार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.











