मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे कारण मी आत्मज्ञानी आहे, अशा शब्दांत भोंदूगिरीचा आरोप असलेला राजेंद्र गडगे याने पोलिसांसमोर छातीठोकपणे सांगितले.पोलिसांनी बोलण्यास मज्जाव केल्यानंतर पोलीस माझा छळ करताहेत, असे खापरही त्याने फोडले.
संगमनेर पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून त्याला ‘दत्तधाम’ दरबारात नेले असता, त्याने अटकेचा निषेध करत हा सनातन धर्मावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. मला अडकविण्याचा कट असून ज्याचा माझ्यावर आक्षेप होता, त्याने माझ्या दरबारात यायला हवे होते, असेही तो म्हणाला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील त्याच्या दरबारात आणले. ज्या ठिकाणी आजार बरे करण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक व्हायची, त्याच ठिकाणी पोलिसांनी कसून झडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी दरबारातून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि संशयास्पद औषधी साहित्य हस्तगत केले आहे.
पोलिस कोठडीत असताना आणि तपासादरम्यान गडगेने पोलिसांसमोर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मला १०० टक्के अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. मला अटक करणे म्हणजे सनातन धर्माचे खंडन करण्यासारखे आहे. माझ्याकडे कॅन्सर, डायबेटिस, सांधेवात अशा सर्व आजारांचे रुग्ण येतात. मी केवळ प्रार्थना, ध्यान, संकल्प आणि यज्ञ-हवन करतो. ही एक वैदिक प्रक्रिया आहे. मी मंत्र-तंत्र वापरत नाही, पण मी त्यांचा बाप आहे कारण मी आत्मज्ञानी आहे आणि खूप अभ्यास केला आहे, असे भोंदू गडगे म्हणाले.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गडगेला पत्रकारांनी अनेकदा कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यावर ठाम आहे का असे विचारले. त्यावर त्याने गोल गोल फिरवून शेवटपर्यंत उत्तर देणे टाळले. माझ्याकडे सगळे आजार असलेले रुग्ण येतात. देवाकडे कुणीही येऊ शकतो, असे गोल गोल फिरवून मूळ प्रश्नाचे उत्तर देणे त्याने टाळले.
अंनिसच्या तक्रारीनंतर गडगे महाराजाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यावर विचारले असता. मी अंनिसला आधीच आव्हान दिले होते की मी काय करतोय ते डोळ्यांनी पाहा. ज्याचा कुणाचा आक्षेप होता, त्याने माझ्या दरबारात यायला पाहिजे होते. मी मंत्र-तंत्र वापरत नाही, पण त्याचा बाप आहे कारण मी आत्मज्ञानी आहे आणि खूप अभ्यास केला आहे, असे तो म्हणाला.












