नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण नुकतेच समोर आलं आहे. या प्रकरणामुळे राज्यसह देशातील राजकारण तापलं असताना पुण्यातील आयटी कंपनीमध्ये सुरू असलेल्या धार्मिक प्रकाराबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील विश्रांती कक्षांच्या वापराबाबत आलेल्या गंभीर तक्रारींकडे लक्ष दिले आहे. या संदर्भात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
माधुरी मिसाळ यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला विविध स्रोतांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष (resting rooms) यांच्या वापराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आणि त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
वरील माहिती ही अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नसून, तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे.विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने काउन्सलिंग/संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.तरी सदर विषय संवेदनशील असल्याने, आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशी सूचना या पत्राद्वारे मिसळ यांनी दिली आहे.
याबाबत माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी करून इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी चिंताजनक आहेत.कार्यस्थळी भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. पुणे पोलिस आयुक्तांना सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.












