सातारा जिल्ह्यात शिवसेना – शिव कामगार सेनेचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी वाई येथील सर्किट हाऊस येथे पदनियुक्तीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिव कामगार सेना सातारा जिल्हाध्यक्ष श्री. योगेश दादा फाळके यांनी दिली.जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, कामगार नेते तसेच संघटनात्मक काम करण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे सांगत, इच्छुकांनी दुपारी १ वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना शिव कामगार सेना सातारा जिल्हाध्यक्ष श्री. योगेश दादा फाळके यांनी सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र, विशेषतः एमआयडीसी भागातील कामगारांच्या समस्या अधोरेखित केल्या. स्थानिक कामगारांना प्राधान्य न मिळणे, परप्रांतीय कामगारांची वाढती संख्या, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव, वेतन व कामाच्या तासांबाबत होणारे उल्लंघन तसेच कंत्राटी पद्धतीतील अन्याय या गंभीर मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.या सर्व प्रश्नांवर ठोस भूमिका घेत कामगारांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आणि औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना प्राधान्य मिळवून देणे हे शिव कामगार सेनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. शिव कामगार सेना ही कामगार क्षेत्रातील भक्कम फळी असून, सातारा जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करून प्रत्येक उद्योगात कामगारांचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले.शेवटी, जिल्ह्यातील जिद्दी व लढाऊ शिवसैनिकांना संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करत, “कामगारांचा हक्क – आमची जबाबदारी!” असा संदेश देण्यात आला.











