वाई, दि. ०३ : नावेची वाडी, ता. वाई येथील रहिवासी तसेच पत्रकार श्री. प्रविण गाडे यांचे वडील श्री. विठ्ठल अंतू गाडे (वय ७३) यांचे शनिवार, दि. २ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका सात्विक, कष्टाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे.
स्व. विठ्ठल गाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणा, प्रामाणिकपणा आणि परोपकाराच्या मार्गाने व्यतीत केले. कोणाशीही वाद न ठेवता सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य सर्वांच्या मनात घर करून गेले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत पांडुरंगावरील त्यांची अढळ श्रद्धा, तसेच भजन-कीर्तनाची आवड, ही त्यांच्या जीवनाची ओळख होती.
व्यवसायाने गवंडी असलेल्या विठ्ठल गाडे यांनी आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर अनेकांची स्वप्नातील घरे उभी केली. मात्र, स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असतानाच काळाने त्यांना हिरावून नेले. अर्धवट राहिलेले हे स्वप्न आज कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी ठरत आहे.
रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी वाई येथील रविवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. विठ्ठल गाडे यांचा सावडण्याचा विधी सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता रविवार पेठ, वाई येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती गाडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.











