आंबेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला पैशांचे आमिष दाखवत मैत्री करण्याचा प्रयत्न, तसेच मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिची बदनामी करण्यासाठी परिसरात बदनामीकारक पोस्टर लावल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संबंधित वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सतिश पांडुरंग खोंड (वय ६५, रा. शिवकृपा रेसिडेन्सी, टेल्को कॉलनी, दत्तनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्यात एका १७ वर्षांच्या मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि आरोपी सतिश खोंड हे एकमेकांच्या ओळखीचे होते. आरोपी खोंड हा फिर्यादी मुलीला कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने चार ते पाच वेळा तिच्या घरी येत होता. या दरम्यान तो वेळोवेळी तिला पैसे देण्याचे आमिष दाखवत तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच ती कुठे जाते, काय करते यावर लक्ष ठेवून तिचा सातत्याने पाठलाग करत असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मुलीने आपल्या कुटुंबीयांना दिल्यानंतर आरोपी खोंड याला राग आला. त्यानंतर त्याने फिर्यादी मुलीला पाहून घेण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने एका मोठ्या कागदावर हाताने बदनामीकारक मजकूर लिहून त्याचे पोस्टर तयार केले आणि ते फिर्यादीच्या राहत्या परिसरात लावून तिची व तिच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
हे बदनामीकारक पोस्टर पाहिल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या मुलीने आंबेगाव पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवधर करीत असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.












