सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त जीवनगौरव’ व ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित झाले आहेत. शनिवारी (ता. ७) बाणेर येथील बंटारा भवनमध्ये माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्याला भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती आणि ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद उपस्थित राहणार आहेत.
‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ यंदा उदय लळीत, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ॲड. प्रमोद आडकर, साहित्यिक प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, रणनीतीकार संजय पुरी यांना; तर आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे.












