महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी शिबिराचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (PDEA) तब्बल ३४८ विद्यार्थ्यांनी बाजी मारत राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.
संस्थेच्या या यशाने गतवर्षीचा स्वतःचाच उच्चांक मोडीत काढला असून, राज्यामध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी संस्था म्हणून मान मिळवला आहे. मात्र, या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी हे यश संस्थेचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांना समर्पित करून एक अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी अजित पवार यांनी संस्थेच्या प्रत्येक शाखेत स्काऊट-गाईड उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्याच प्रेरणेतून संस्थेच्या ३० शाळांमधील १५० मुले (स्काऊट) आणि १९८ मुली (गाईड) अशा एकूण ३४८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना १० वीच्या परीक्षेत वाढीव ३ गुणांचा लाभ मिळणार आहे.
यशाचा प्रवास आणि चाचणी शिबिर
या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विशेष चाचणी शिबिरे घेण्यात आली होती. त्यानंतर १६ ते २३ जानेवारी दरम्यान भोर येथे झालेल्या राज्यस्तरीय चाचणी शिबिरात या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुळशी, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, खेड, दौंड, शिरूर, मावळ आणि हवेली अशा विविध तालुक्यातील संस्थेच्या शाळांनी या यशात आपला वाटा उचलला आहे.
शाबासकीची थाप द्यायला दादा हवे होते…
निकालाचे वृत्त समजताच संस्थेच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले असले तरी, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी होते. ‘हे यश पाहण्यासाठी आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आज दादा हवे होते,’ अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.












