
पुणे :
दिनांक 05.02.2026 रोजी सकाळी 10.00 ते 11.30 वाजेपर्यंत आंबेगाव पोलीस स्टेशन परिसरातील श्री चक्रधर परमानंद शिक्षण माध्यमिक विद्यालय, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग जागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
या अभियानामध्ये डॉ. ईशा तिथे (भारती विद्यापीठ हॉस्पिटल), प्राजक्ता सूर्यवंशी, शुभांगी इंदुलकर, रोहिणी कदम तसेच कॅन किड किट कॅन ऑर्गनायझेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना कर्करोगाविषयी सखोल माहिती देण्यात आली. कर्करोग म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर तपासणीचे महत्त्व तसेच उपचार पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी दामिनी मार्शल यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, गुड टच – बॅड टच याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही प्रकारच्या अत्याचार, छळ किंवा गैरप्रकाराबाबत मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन नंबर विषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य तो सल्लाही देण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुश घोलप सर, शाळेतील शिक्षक-शिक्षिका, दामिनी मार्शल गोपनीय विभागाचे अंमलदार यांची उपस्थिती लाभली. तसेच या उपक्रमात 200 ते 250 विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कर्करोगासारख्या गंभीर आजाराविषयी योग्य माहिती देणे, तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
आदरपूर्वक सादर,
शरद झिने
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे











