वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी थांबली असून, आता सर्वांचे लक्ष आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. वाई तालुक्यात एकूण 65.69 टक्के मतदान झाले असून, 181 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण मतदान प्रक्रिया शिस्तबद्ध आणि निर्भय वातावरणात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निवडणूक प्रचाराच्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण धुरा नामदार मकरंद पाटील आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्या खांद्यावर होती. दरम्यान, अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादीचे कोणतेही मोठे नेतृत्व वाई तालुक्यात प्रचारासाठी येऊ शकले नाही.
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे स्वतः मैदानात उतरले होते. प्रचारादरम्यान दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच, तालुक्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली असून, या उमेदवारांच्या भवितव्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवसेना पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्याने, निकाल अधिकच चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची अपेक्षा असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
आता वाई तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर नेमकी कोणाची सत्ता येणार, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.











