नातेवाईकाच्या लग्नासाठी दोन ते तीन दिवसांसाठी घेतलेली तब्बल १२ लाख रुपये किमतीची आलिशान मोटार बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे.
ही घटना २० सप्टेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली आहे.याप्रकरणी ऋषीकेश विठ्ठल महापुरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भालचंद्र सुखदेव थोरात (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना अटक केली असून, त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे कारण सांगून मोटार ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालचंद्र थोरात याने फिर्यादी ऋषीकेश महापुरे यांच्याकडून नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवसांसाठी मोटार मागितली होती. ओळखीचा व विश्वासाचा गैरफायदा घेत फिर्यादीने मोटार आरोपीच्या ताब्यात दिली. मात्र ठरलेल्या वेळेत मोटार परत न देता आरोपींनी संगनमत करून फसवणुकीचा डाव रचला.
बनावट आरसी, आधार व पॅनकार्ड तयार
आरोपींनी मोटारीचे बनावट आरसी बुक, तसेच फिर्यादीच्या नावाचे खोटे आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणतीही संमती न घेता मोटार परस्पर विक्री करून आरोपींनी आर्थिक लाभ मिळवला. या प्रकारामुळे फिर्यादीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे.
गुन्हा दाखल;
तपास सुरूफिर्याद दाखल होताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी भालचंद्र थोरात याला अटक केली. तसेच त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व विश्वासघात या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मोटार कुणाला विकण्यात आली, व्यवहारातून किती रक्कम मिळवण्यात आली आणि इतर कोणी यात सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.












