बावधन पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत कारवाई करत गांजा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता सहिल प्रॉपर्टीज येथील लेबर कॅम्प, केडीपी अर्धवन, महाळुंगे (पुणे) येथील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी संशयितावर काही काळ नजर ठेवून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद सरफुद्दीन खालिद (वय ३२) असे असून तो सध्या महाळुंगे, पुणे येथे वास्तव्यास आहे. तपासादरम्यान तो मूळचा आझमनगर, जिल्हा कटिहार, बिहार येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई बावधन पोलिस ठाणे येथील पोलीस शिपाई दत्तात्रय उत्तम शिंदे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.












