वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार सातारा जिल्ह्यातील मौजे वेलंग (ता. वाई) येथे दरवर्षी भरणारा जनावरांचा जंगी वार्षिक बाजार यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. वाई शेती उत्पन्न बाजार समिती यांच्या पुढाकारातून २१ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान हा नऊ दिवसांचा बैल बाजार भरविण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आणि सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा हा बाजार पाहण्यासाठी तसेच खरेदी-विक्रीसाठी भोर, पुणे, कर्नाटक, सांगली, अहिल्यानगर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

या बाजारात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते.
बाजारानिमित्त येणाऱ्या जनावरांसाठी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि दिवाबत्तीची विशेष सोय करण्यात आली आहे. ही व्यवस्था बाजार समिती व वेलंग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती मोहन जाधव व सचिव महेंद्र खांडे यांनी दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध तालुक्यांतून व राज्यातून येणाऱ्या नामांकित व उत्कृष्ट जनावरांची निवड करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. निवड झालेल्या जनावरांना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत आयोजित बक्षीस समारंभात पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समिती व वेलंग ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले आहे.











