गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत होती. त्यामुळे शहरातील उकाड्यातदेखील वाढ झाली होती. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांत १८ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, शनिवारी यात किंचित घट होऊन ते १७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.तर कमाल तापमान मात्र स्थिर राहून ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
तापमानात सतत चढ-उतार होत आहे. शनिवारी सकाळी काहीअंशी ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारी कडक ऊन पडल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.पुढील दोन ते तीन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) कमाल तापमान स्थिर राहून किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर १७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.
आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपासून (ता. २४) कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.












