सिंहगड रोडवरील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुठा नदीवर उभारण्यात येत असलेल्या सनसिटी ते कर्वेनगर जोडणाऱ्या पुलाचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सिंहगड रोड, कोथरूड आणि कर्वेनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, वारजे महामार्गावरील ताणही लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
सिंहगड रोडवरून कर्वेनगर, कोथरूड, तसेच या भागांतून सातारा रस्ता आणि कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वारजे परिसरातील महामार्गावरील पुलावर सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगरदरम्यान मुठा नदीवर नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. मे 2023 मध्ये या कामाचा कार्यादेश दिला आणि सप्टेंबर 2023 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. गेल्या अडीच वर्षांत काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून, आता अंतिम टप्पा सुरू आहे.
कामाची सद्य:स्थिती
कर्वेनगरकडील बाजूस खांब, गर्डर आणि पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सनसिटीकडील सहा खांबांपैकी चार खांब पूर्ण झाले असून, उर्वरित दोन खांबांचे काम सुरू आहे. तसेच, या बाजूस स्पॅन आणि उताराच्या कामाला अजून वेळ लागणार आहे. यानंतर दोन्ही बाजूंना डांबरीकरण, विद्युत दिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पदपथ यांसारखी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करून एप्रिलअखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विशेष प्रकल्प विभाग प्रयत्नशील आहे.
पुलाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी-279मीटर
रुंदी – 30 मीटर
पोहोच रस्ता (कर्वेनगर बाजू) – 34 मीटर
पोहोच रस्ता (सनसिटी बाजू) -20 मीटर
पोहोच रस्त्याची रुंदी- 30 मीटर
अस्तित्वातील रस्त्याची रुंदी (सनसिटी बाजू) – 30 मीटर
एकूण गाळे – 9एकूण खर्च – 44 कोटी 86 लाख रुपये












