उरुळी कांचन – पुणे सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वर कुंजीरवाडी गावातील आळंदी म्हातोबाकडे व नायगाव पेठकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या चौकामध्ये तसेच थेऊर फाटा चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी ही कायमची डोकेदुखी झाल्याने महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर जे अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागणार आहे.
त्याठिकाणी जाण्यासाठी या वाहतूक कोंडीमुळे किमान दीड ते दोन तासांचे नियोजन करूनच निघावे लागते, ही गेल्या कित्येक दिवसापासूनची समस्या याभागातील सर्वसामान्य जनता अनुभवत आहे.मात्र, या समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,पोलीस प्रशासन किंवा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्यावरून पुण्याच्या दिशेला जाणारी व सोलापूरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांची दमछाक होते, वाहन चालक वैतागून जातात, या वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून रुग्णवाहिका आणि अत्यवस्थ रुग्णही सुटत नाहीत.
या पट्ट्यातील स्थानिक नागरिक हे धनिक व अनेक वाहनांचे मालक असल्याने किरकोळ कामासाठी देखील चारचाकी वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गरजेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर येण्याने या कोंडीत मोठी भर पडत असते.विशेष म्हणजे हे नागरिक वाहतुकीचे कोणतेही बंधन वा नियम न पाळता या दोन्ही चौकामध्ये वाहने आडवी लावून एकमेकाला अडचणीत आणण्याचे काम करतात त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते, मात्र पोलीस प्रशासन या बाबीकडे हद्दीचा वाद सांगत दुर्लक्ष करतात.
या बाबीची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यामध्ये समन्वय घडवून आणत. या वाहतूक कोंडी बद्दल जनतेला दिलासा देणारा मार्ग काढला पाहिजे. अशी मागणी या रस्त्याने प्रवास करणारे नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
या सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, कंपनी कामगार, शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणारे शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या वेळेचे नियोजन बिघडते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.
याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,या चौकातील वाहतूक कोंडी बाबत काही सुधारणा करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या समन्वयातून मुंबईला मंजुरीसाठी पाठवला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसल्याने, सध्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या जीवावरच तेथील नियोजन चालू आहे पण त्याने समस्या थांबत नाही हे वास्तव आहे.












