पुणे प्रतिनिधी : दत्तात्रय कांबळे
परिसरात वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारती विद्यापीठ वाहतूक विभाग पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कर्णकर्कश मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या ५० बुलेट चालकांवर कठोर कारवाई केली. या कारवाईदरम्यान तब्बल ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून सर्व मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. शहरासह दक्षिण उपनगरात काही वाहनचालकांकडून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर बसवले जात होते. या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ध्वनिप्रदूषणाबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
मोहीमे दरम्यान ५० बुलेट दुचाकी वाहने ताब्यात घेऊन त्यांवरील मॉडिफाइड सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ज्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट नव्हती, त्यांच्यावरही कारवाई करून मूळ नंबर प्लेट बसविण्याचे आदेश देण्यात आले. भारती विद्यापीठ परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याशिवाय सातारा रस्ता आणि कात्रज-देहू रोड बाह्यवळण मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागत होता.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारची कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.











