घरात नेहमी ये-जा असलेल्या मैत्रिणीनेच कपाटातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे सुमारे दोन लाख ४१ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना चिंचवड येथे १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली.
याप्रकरणी एका महिलेने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीची मैत्रीण ही नेहमी घरी येत असल्याने तिला घरातील दागिने कोठे ठेवतात हे माहिती होते. त्या मैत्रिणीने १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्वाच्या नकळत घरातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे दोन लाख ४१ हजार ४५० रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
पर्समधून पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अटक
बँकेतून पैसे काढल्यानंतर पर्समधून १० हजार रुपये चोरल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान लांडेवाडी, भोसरी येथे घडला.आसाना रघुवीर सिसोदीया (३२, गुलखेडी, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व ललिता मलखान सिसोदीया (३०, कढीया, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला यांनी एका बँकेच्या लांडेवाडी, भोसरी शाखेतून ६० हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेत आरोपी आसाना व ललिता यांनी फिर्यादी महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.












