पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या (एअर इंटेलिजन्स युनिट) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत सुमारे ७४.५० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) जप्त केला आहे.
ही कारवाई मार्च २०२६ रोजी करण्यात आली.अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बँकॉकहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-241 या विमानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमानातील लॅव्हेटरीतील टिश्यू कॅबिनेटमध्ये दोन पिवळ्या रंगाचे फूड पॅकेट आढळून आले.
ही पॅकेट उघडून पाहिली असता त्यामध्ये एकूण ८ व्हॅक्युम सीलबंद पॅकेटमध्ये ७४५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे ७४.५० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर अमली पदार्थ एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून हा माल कोणाकडून आणला गेला आणि कोणासाठी ठेवण्यात आला होता याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.












