गावी जाताना दरवाजाला कुलूप लावून बाहेर चावी ठेवणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेऊन एका महिलेने सांगवी येथे दोन घरफोड्या केल्या. गुन्हे शाखा युनिट एकने सांगवी ते वारजे माळवाडी पर्यंत सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपी महिलेची ओळख पटवली.त्यानंतर तिला अटक करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले.
सुमन दत्ता लोंढे ( वय ३५, रा. अचानक चौक, रामनगर वारजे माळवाडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकने केला.
पथकाने सांगवी ते वारजे माळवाडी दरम्यान सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक महिला चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महिलेची माहिती घेत तिला अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान तिच्याकडे तपास करत तिच्याकडून आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
महिलेने मागील वर्षी सांगवी येथे आणखी एक घरफोडी केल्याचे सांगितले.नागरिक घरातून बाहेर जाताना घराला कुलूप लावतात, मात्र चावी दरवाजाच्या बाहेर कुठेतरी लपवून ठेवतात. चावी लपवून ठेवणाऱ्या नागरिकांवर आरोपी महिला पाळत ठेवत असे. त्यानंतर संधी साधून तिने या चोऱ्या केल्या होत्या. महिलेला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल उषा दळे, महादेव जावळे, शिवराम भोपे, अजय डगळे, जयवंत राऊत, देवा राऊत, विजय शेळकंदे, तेजस भालचिम, संदेश देशमुख, विजय जानराव यांनी केली आहे.












