सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली खेड तालुक्यातील धामणे गावची अश्विनी अरुण कोळेकरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी यूपीएससीमध्ये ऑल इंडिया ६७५ रँक मिळवून पश्चिम पट्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
अश्विनीचे वडील अरुण हे दहावी पास तर आई जाणता या निरक्षर आहेत. इतर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाप्रमाणे या कोळेकर कुटुंबाला देखील पोटापुरती शेती आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. या दोन्हींतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालायचे.
लहानपणापासून अश्विनीने त्याची जाणीव ठेवली.तिने प्राथमिक शिक्षण धामणे येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण पाईट येथील कुंडेश्वर विद्यालयात आणि बारावीपर्यंत राजगुरूनगरच्या हुतात्मा महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात मॉडर्न कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने यूपीएससीचा निर्णय घेतला. शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अश्विनी वर्गात कायम अव्वल येत राहिली. याही परीक्षेत तिने कोणताही क्लास न लावता घरीच स्वतः अभ्यास करून वयाच्या २५ व्या वर्षी चौथ्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवले.
अश्विनीचे प्रशासकीय सेवेतील श्रद्धास्थान आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे आहेत.या परीक्षेपर्यंत अश्विनीला अनेक अडचणींचा एकटीने सामना करावा लागला, पण तिने धीर धरत मार्ग काढला. या परीक्षेच्यावेळी तिच्या आजोबांचे निधन झाले होते, तर मुलाखतीच्या वेळी वडिलांचा अपघात होऊन ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.
मात्र, यावर अश्विनीने मात करीत परीक्षा दिली व त्यात यश मिळविले.या सर्व कालावधीत तिचे आईवडील आणि सर्वच शिक्षकांनी तिचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मदत केल्याचे तिने सांगितले. धामणे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात तिचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी गावकऱ्यांनी तिच्या या यशाचे भरभरून कौतुक केले.












