शहरातील हरातील बेकायदेशीर होर्डिंग, वाढते अतिक्रमण आणि त्यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण यावर आळा घालण्यासाठी पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.११ मार्च रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर प्रशासनाने तत्काळ अक्शन मोडमध्ये येत १२ मार्चच्या रात्री उशिरा मोठी कारवाई केली. या कारवाईत अवघ्या एका रात्रीत तब्बल ९७४ अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आल्याची माहिती प्रशासने दिली आहे.
ही कारवाई शहरभर एकाच वेळी करण्यात आली असून, महापालिकेचे विविध विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये, पदपथांवर तसेच पुलांवर उभारण्यात आलेली अनेक अनधिकृत जाहिरातफलक या कारवाईत काढून टाकण्यात आले. शहरातील बेकायदेशीर होर्डिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.
या बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह महापालिका आणि पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील अनधिकृत जाहिरातफलक, अतिक्रमण, बेवारस वाहने, शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील तंबाखू विक्री आणि मान्सूनपूर्व तयारी यांसारख्या विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शहरातील वाढत्या अनधिकृत होर्डिंगच्या समस्येवर विशेष भर देण्यात आला. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर जाहिरातफलक उभारले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही, तर वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. काही ठिकाणी मोठ्या आकाराच्या होर्डिंगमुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या.दरम्यान, शहरातील विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने यापूर्वीही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
अनधिकृत पोस्टर, बॅनर आणि जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहर विद्रुपीकरणाच्या प्रकरणात सुमारे ५२५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असताना अनधिकृत जाहिरातफलक आणि अतिक्रमण यांसारख्या समस्या देखील वाढत आहेत. त्यामुळे शहराचे नियोजन आणि सौंदर्य टिकवण्यासाठी अशा कारवायांची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
कारवाईत सातत्य राहणार का?
मात्र यापूर्वीही अशा प्रकारच्या मोहिमा जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस कारवाई होत असली, तरी नंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे यावेळी प्रशासनाची मोहीम किती सातत्याने आणि प्रभावीपणे राबवली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी एका रात्रीत जवळपास हजार होर्डिंग हटवून प्रशासनाने आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत शहरातील उर्वरित अनधिकृत होर्डिंगवरही अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याने पुणे शहरातील विद्रुपीकरणावर काही प्रमाणात तरी आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापुढेही मोहीम सुरूच राहणार
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी पुढील एका आठवड्यात व्यापक मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार १२ मार्चपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्याच टप्प्यात १२ मार्चच्या रात्री उशिरा करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ९७४ होर्डिंग हटवण्यात आली. त्यामुळे प्रशासनाची मोहीम किती मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे याचा अंदाज येतो. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
परवानगीशिवाय होर्डिंग लावू नये
पोलीस आणि महापालिकेची संयुक्त पथके शहरातील विविध भागांत कारवाई करणार आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करून ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. या पथकांना संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची मदत मिळणार आहे. याशिवाय शहरात होर्डिंग छापणाऱ्या आणि उभारणाऱ्या संबंधित व्यावसायिकांचीही स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येणार असून परवानगीशिवाय जाहिरातफलक उभारू नयेत, असे स्पष्ट करण्यात येणार आहे.
अडथळा आणल्यास कठोर कारवाई
प्रशासनाने यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला आहे की, सूचना देऊनही कोणी पुन्हा बेकायदेशीर होर्डिंग उभारल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याचीही तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. कारवाईदरम्यान काही ठिकाणी विरोध किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.












