पुणे :उन्हाळ्याच्या सुरुवातीसच अन्न व पाण्याच्या शोधात वानरांच्या टोळ्यांनी शहरात प्रवेश केल्याच्या घटना समोर येत आहेत. मध्यवस्तीतील विविध भागांमध्ये वानरांचे मुक्त संचार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नारायण पेठ परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या हरिभाऊ साने वाहनतळाच्या आवारात नुकतीच वानरांची एक टोळी दाखल झाली असून ती गेल्या काही वेळापासून परिसरात वावरत आहे.
यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी कोंढवे धावडे परिसराच्या पुढे खडकवासला धरणालगतच्या रस्त्यावर अशाच प्रकारची वानरांची टोळी ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून आले होते.सुदैवाने अद्याप या वानरांकडून कोणत्याही नागरिकांवर हल्ला झालेला नाही किंवा इजा झालेली नाही. मात्र, वानरांची वाढती संख्या आणि त्यांचा वावर पाहता लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत पुणे मनपाचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “मनपाचे रेस्क्यू सेंटर वन विभागाच्या सूचनेनुसार बंद करण्यात आले असून या संदर्भात नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधावा.”
दरम्यान, संबंधित नागरिकांनी वन विभागाकडे निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात वानरांचा वाढता वावर लक्षात घेता प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत तसेच नागरिकांनीही दक्षता बाळगावी, अशा सूचना करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांसाठी सूचना :
वानरांना खाऊ घालणे टाळावे
लहान मुलांना एकटे सोडू नये
घरांच्या खिडक्या-दारे सुरक्षित ठेवावीत
वानर दिसल्यास त्यांना चिडवू नये किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये












