खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी या कारवाईत दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख १६ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांतील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पवन छगन उजगरे (वय २६, रा. समता कॉलनी, काळेवाडी, पुणे) आणि २) सुमित हनुमंत कराड (वय २८, रा. ज्ञानेश्वरी पार्क, दिघी रोड, भोसरी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी सुरज ज्ञानेश्वर शेलार यांचे पैशांच्या मागणीसाठी अपहरण झाल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना, हे आरोपी भोसरी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या मैदानात दोन रिक्षांसह थांबलेले आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला, मात्र आवश्यक बळाचा वापर करून त्यांना जेरबंद करण्यात आले. तपासात असे समोर आले की, याच आरोपींनी १५ मार्च रोजी नाशिक फाटा येथून नितीन महाजन यांना रिक्षामध्ये बसवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले होते आणि त्यांच्याकडून फोन पे द्वारे जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करून घेतले होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे आणि प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या पथकामध्ये खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुनील भदाणे, अमर राऊत, सहायक उपनिरीक्षक सुनील कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, चंद्रकांत जाधव, किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे आणि भरत गाडे यांचा समावेश होता.












