पुणे: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तसेच सुजय प्रतिष्ठान व मैत्री रक्ताची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी स्वतः १०१वे रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
हिंदू ग्रुप, रविवार पेठ, पुणे यांच्या वतीने गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुरेश सकपाळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
उपक्रमासाठी आदर्श सेवा मंडळाचे सहकार्य लाभले. या वेळी हिंदू ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले १०१वे रक्तदान करताना सुरेश सकपाळ यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, “रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. युवकांनी पुढाकार घेऊन नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन केले. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत, युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण झाली.












