राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे स्टेशन ते बोरीवली (सायनमार्गे) या मार्गावर ‘शिवाई’ ही वातानुकूलित बससेवा प्रवाशांच्या मागणीवरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा शिवाजीनगर आगारातून संचालित करण्यात येणार आहे. ‘शिवाई’ वातानुकूलित बस सेवा सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारी म्हणून ओळखली जाते.
काय आहे मार्ग आणि वेळा?
पुणे स्टेशन-चिंचवड-सायन मार्गे बोरीवली असा या सेवेचा मार्ग आहे. सकाळी सहा, सात, आठ आणि नऊ वाजता, तर दुपारी एक, दोन, तीन वाजता; तसेच सायंकाळी चार वाजता या बसच्या फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.
कुठे करता येणार बुकिंग?
प्रवाशांना सोयीस्करपणे आगाऊ तिकीट आरक्षण करता यावे यासाठी पुणे स्टेशन बसस्थानक, वल्लभनगर, चिंचवड स्टेशन आणि निगडी या ठिकाणांहून आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी एमएसआरसीटीसी मोबाइल ॲप किंवा https://npublic. msrtcors.com/ या वेबसाइटच्या माध्यमातूनही ऑनलाइन आरक्षण करू शकतात.
थांब्याची उद्घोषणा बंद
दुसरीकडे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली पुढील थांबा (उद्घोषणा) अनाउन्स्मेंट यंत्रणा अनेक बसमध्ये पुन्हा बंद पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसची संख्या अधिक आहे. ही यंत्रणा बंद पडल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.












