लाचखोरीचा सलग दुसऱ्या दिवशी देखील थरार घडला असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘वनक्षेत्र सर्व्हेक्षका’ला चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयाच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर या लाचखोरीच्या सापळा कारवाईचा थरार भरदुपारी घडला आहे.
या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीच्या सातबारावर लागलेले खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आली आहे.उदयसिंग भिमराव कुंभार (वय ४६, रा. कात्रज मुळ. रा. सातारा) असे पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ नुसार गुन्हा नोंद केला आहे.तक्रारदार हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करतात. त्यांनी वडगाव मावळ भागातील चिखलसेगाव, आपटी व कुणेणामा या गावात जमीन घेतलेली आहे. यातील काही गटात जमिनीच्या सातबारावर खासगी वनाचे शेरे लागले होते.
खासगी बनाचे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी रिस्टोर्ड ऑर्डर्स महसूल विभागाकडून करण्यात येऊन त्या ऑर्डर्स वन विभागाच्या अभिलेखावर देण्यात आल्या होत्या. तक्रारदार यांना त्यांच्या व्यावसायाच्या अनुषंगाने ११ रिस्टोर्ड ऑर्डरच्या प्रतींची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी या प्रती मिळविण्यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता.
या अर्जाच्या चौकशीसाठी ते कार्यालयात गेले असता त्यांचे काम हे वनक्षेत्र सर्व्हेक्षक लोकसेवक उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याचे समजले. त्यानूसार, तक्रारदार हे कुंभार यांना भेटले.तेव्हा लोकसेवक कुंभार यांनी ११ रिस्टोर्ड ऑर्डर पैकी ७ ऑर्डर त्यांच्या कार्यालयात असून, त्यासाठी ७ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत लोकसेवक कुंभार यांनी तडजोडीअंती चार लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानूसार, रविवारी सेनापती बापट रस्त्यावरील कार्यालयाच्या परिसराजवळ एसीबीने सापळा कारवाई करून सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्याकडून चार लाखांची लाच घेताना कुंभार यांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली.












