पोलिसांना पाच महिने गुंगारा देणाऱ्या भामट्याला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. या आरोपीने शुद्ध सोने असल्याचा दावा करून ठाणे आणि भिवंडीतील सराफांची फसवणूक केली होती. ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पोलिसांनी त्याच्याकडून 3 कोटी रुपये मूल्य असलेले सोने आणि 17 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली.
पोलिसांनी हा ऐवज आणि रक्कम ठाणे जिल्हा तसेच राजस्थानमधील पालीमध्ये जाऊन जप्त केला आहे.जीवाराम वर्धाजी चौधरी (46, ठाणे, मूळगाव पाली-राजस्थान) यांनी गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास काही सराफांना गंडा घातला होता.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात 17 ऑक्टोबर 2025 आणि 29 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास ठाणे गुन्हे शाखा घटक 1 कडून करण्यात येत होता.मात्र, आरोपी जीवाराम चौधरी वारंवार लोकेशन बदलत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण जात होते.
अखेर तो ठाण्यातील घोडबंदर रोडवर येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक घुगे आणि त्यांच्या पथकाने आरोपीला 23 मार्च रोजी रात्री अटक केली.न्यायालयाने आरोपीला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
त्या तपासात पोलिसांनी पाली-राजस्थान आणि ठाणे जिल्ह्यातून 1 किलो 216 ग्रॅम आणि 742 ग्रॅमच्या सोन्याच्या लगडी जप्त केल्या. त्यांची किंमत 3 कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून 17 लाख 50 हजार रुपये हस्तगत केले.
अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहा. पोलीस आयुक्त शोध 1 (गुन्हे शाखा), शेखर बागडे यांच्या सूचनांचे पालन करत व.पो.नि. सचिन गायकवाड, उपनिरीक्षक दीपक घुगे, दीपक जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुनील माने, हवालदार संदीप महाडिक, प्रशांत निकुंभ, अविनाश पाटील, शब्बीर फरास, सागर सुरळकर, अमोल ढावरे, प्रशांत लवटे यांनी ही कामगिरी केली.












