वाई शहरात भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल सावंत, सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा व पंचायत समिती सदस्य सुरभीताई भोसले, विरोधी पक्ष नेते व वाई शहर भाजप अध्यक्ष विजय ढेकाणे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना विजय ढेकाणे यांनी स्थापना दिनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ६ एप्रिल हा दिवस केवळ एक दिनांक नसून देशसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि विचारसरणीचा पवित्र संकल्प दिवस आहे. सन १९८० मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. “अंधकारातून प्रकाशाकडे” नेण्याचा संकल्प त्यांनी केला असून आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्याचेही त्यांनी नमूद केले.सुरभीताई भोसले यांनी पक्षाच्या यशामागे कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असून त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि समर्पणामुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे, असे त्या म्हणाल्या.नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहराच्या विकासासाठी भाजप कार्यकर्ते सातत्याने काम करत असल्याचे सांगितले. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यावर भर देत “वाईला आदर्श शहर बनवूया” असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी सर्व उपस्थितांनी देशहित सर्वोच्च मानून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.











