मिरा भाईंदरमधील काशिगाव मेट्रो स्थानकाखाली मोठ्या संख्येने वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्य मार्गांवरून जाणाऱ्या नागरिकांचा मोठा वेळ वाया जात आहे.
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ तीन दिवसांपूर्वी सेवेत दाखल झाली आहे. या मार्गिकेअंतर्गत काशिगाव ते दहिसरमार्गे मुंबई असा पहिल्या टप्प्यातील प्रवास सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे शहरातील चाकरमानी वर्ग मोठ्या संख्येने या मेट्रोचा लाभ घेत असल्याचे पहिल्याच दिवसापासून दिसून आले आहे.
दरम्यान, मेट्रोची सुविधा उपलब्ध झाली असली तरी स्थानकाभोवती खाजगी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, प्रवाशांना सोडण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि इतर खाजगी वाहने मेट्रो स्थानकाखाली थांबू लागली आहेत.
परिणामी, या वाहनांमुळे मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडीची नवी समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने काशिगाव मेट्रो स्थानक मिरा भाईंदर शहराच्या मुख्य मार्गावर उभारण्यात आले आहे. या स्थानकाजवळच नवा उड्डाण पूल उतरत असल्यामुळे रस्त्यावरील आणि उड्डाण पुलावरून उतरणारी वाहने येथे एकत्र येतात.
त्यामुळे हा रस्ता पूर्वीपासूनच अरुंद वाटत असताना, आता आजूबाजूला मोठ्या संख्येने वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीसाठी निमुळता रस्ता शिल्लक राहतो. परिणामी, ही कोंडी सुटण्यासाठी बराच वेळ लागत असून खाजगी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
मेट्रो स्थानकाखाली मोठ्या संख्येने वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नागरिक समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक संजय थरथरे हे घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून प्रवाशांसाठी मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहेत. तसेच, या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून विनाकारण थांबणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसून आले आहे.












