बाप आणि लेकीचं नातं काही वेगळंच असतं. लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा बाप मात्र स्वत:च्या काळजाचा तुकडा गेल्यावर ना पोलिसांना कळवलं ना कुणाला सांगितलं. मृत लेकीला परफ्यूम लावून तिच्यासोबत पाच महिन्यांपर्यंत राहिला.या बापाची कहाणी हादरवून टाकणारी आहे.
जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले.बाप आपल्या पोटच्या मुलीच्या मृतदेहासोबत तब्बल ५ महिने एकाच घरात राहत होता. मृतदेहाची सडल्यामुळे दुर्गंधी येऊ नये म्हणून तो घरभर परफ्यूम मारायचा. अखेर ५ महिन्यांनंतर जेव्हा घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
बेडवर मृतदेह नाही तर फक्त सांगाडा!
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. तेली मोहल्ल्यात उदय भानु बिस्वास हे त्यांच्या ३४ वर्षीय मुलगी प्रियांकासोबत राहत होते. ५ महिन्यांपूर्वीच प्रियांकाचा मृत्यू झाला होता. पण उदय यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा तिथे कचऱ्याचे ढीग साचले होते आणि बेडवर प्रियांकाचा मृतदेह पूर्णपणे सडून त्याचा फक्त सांगाडा उरला होता.
असा झाला खुलासा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका कोणालाच दिसली नव्हती. प्रियांकाचा चुलत भाऊ बिस्वजीत याने जेव्हा फोन केला, तेव्हा उदय यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. नंतर सांगितलं की, “प्रियांका आजारी असून डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे.” बिस्वजीतला संशय आला आणि त्याने नातेवाईकांसह मेरठ गाठलं. चहाच्या टपरीवर बसलेल्या उदय यांना पकडून जेव्हा घरात नेलं आणि जाब विचारला, तेव्हा त्यांनी घरातच मृतदेह असल्याचं कबूल केलं.
दुर्गंधी लपवण्यासाठी परफ्यूमचा वापर
प्रियांका कॉम्प्युटर शिकवायची. तिला कावीळ झाली होती आणि वडील तिच्यावर औषधांऐवजी जादूटोणा करत होते, अशी माहिती समोर आली आहे. तिचा मृत्यू झाल्यावर उदय घाबरले आणि त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. घराबाहेर दुर्गंधी जाऊ नये म्हणून ते सतत परफ्यूम आणि अगरबत्तीचा वापर करायचे. पोलिसांना घरातून परफ्यूमच्या अनेक रिकाम्या बाटल्याही सापडल्या आहेत.
भूतकाळातील दुर्दैवी घटनाया विचित्र वर्तनाचे धागेदोरे २०१३ सालाशी जोडलेले आहेत. २०१३ मध्ये प्रियांकाच्या आईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आईच्या निधनानंतर प्रियांका मानसिक धक्क्यात होती आणि ती कुणाशीही फारसं बोलायची नाही. आता लेकीचाही मृत्यू झाल्याने उदय बिस्वास यांची मानसिक स्थिती बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.












