नाशिक जिल्हा परिषदेत एसीबीच्या एकापाठोपाठ तीन कारवाया झाल्यानंतर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यानंतर सीईओ ओमकार पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ते अॅक्शन मोडवर आले आहेत.भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली आहेत. कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
यापुढे जिल्हापरिषदेची फाईल जर त्रयस्थ व्यक्तीच्या हातात दिसली तर संबधित कर्मचाऱ्याला थेट घरी पाठवू अर्थात निलंबन करण्याचा इशारा सीईओ ओमकार पवार यांनी दिला आहे.
काही विभागांमध्ये महत्त्वाच्या फायली परिचरांऐवजी त्रयस्थ व्यक्तींच्या हाती सोपविल्या जातात. ज्यामुळे कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार घडतात.तसेच यातून गोपनिय माहिती फुटण्याची तसेच आर्थिक गैरव्यवहार होण्याचे प्रकार घडतात.
त्यामुळे आता फायलींची ने-आण केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांमार्फतच होईल, तीही सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे, तसा आदेशच जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केला आहे.












