पुणे शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.
या प्रयत्नांचा चांगला परिणाम दिसून येत असून, गेल्या चार वर्षांत अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
अपघात रोखण्यासाठी केवळ कारवाईपुरतीच नव्हे, तर जनजागृतीवरही भर दिला जात आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, शिस्त आणि वाहतूक नियमांची माहिती वाढावी यासाठी पुणे शहर पोलिसांकडून ‘Secure Horizons in Education 2025’ ही विशेष योजना राबवली जात आहे. ही योजना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर सुरू राहणार आहे. या उपक्रमाची माहिती देहू रोड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी दिली.
या योजनेअंतर्गत शाळांमध्ये एक दिवसाचा विशेष कार्यक्रम घेतला जात आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, महिला सुरक्षा, सायबर फसवणूक, ऑनलाइन गुन्हे तसेच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होत असल्याचे पोलीस सांगतात.
वाहतूक सुरक्षा सप्ताहात शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. तसेच नियम न पाळणाऱ्यांना समज देत योग्य मार्गदर्शन केले जाते. रिक्षा संघटनांना भेट देऊन चालकांनाही वाहतूक नियमांची माहिती दिली जात आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहरात वर्षभर विविध सुरक्षा उपक्रम राबवले जाणार आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीत रस्ता सुरक्षा, मार्च आणि एप्रिलमध्ये महिला सुरक्षा, जून आणि जुलैमध्ये व्यसनमुक्ती, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मानसिक आरोग्य, ऑक्टोबरमध्ये सायबर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये कामाचा आढावा घेतला जाईल, तर डिसेंबरमध्ये पुढील वर्षाचे नियोजन करण्यात येणार आहे.












