जमीन विकण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल ३२ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १० जानेवारी २०२१ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत माण (ता. मुळशी) परिसरात घडली असून, गुरुवारी (२९ जानेवारी) हिंजवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक आष्टेकर (वय ३५, रा. कोथरूड, पुणे) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हिंजवडी, ता. मुळशी येथील एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित महिलेने फिर्यादीस माण येथील मल्हार पार्क परिसरातील प्लॉट क्रमांक १२ विकण्याचे कबूल केले होते. या व्यवहारासाठी तिने फिर्यादीकडून बँक ट्रान्सफरद्वारे चार लाख ५३ हजार रुपये तसेच रोख स्वरूपात २७ लाख ४७ हजार रुपये असे एकूण ३२ लाख रुपये स्वीकारले. व्यवहाराबाबत साठेखत करून दिले असले, तरी प्रत्यक्षात जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात आलेला नाही.
व्यवहार पूर्ण न झाल्यास खात्री म्हणून दिलेले ३७ लाख रुपयांचे धनादेश वटले नाहीत. तसेच, संशयित महिलेने जमिनीचा ताबा दिला नाही, खरेदीखत करून दिले नाही किंवा घेतलेले पैसेही परत न देता फिर्यादीचा विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.












