वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिले असताना आदेशाची अंमलबजावणी न केल्याने मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी ४५ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ८२ वर्षीय वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ च्या कलम २४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाकडून सांभाळ न केला जात असल्याने वडिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकारणाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर न्यायाधिकरणाने वृद्ध आई-वडिलांना दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर मुलाने पैसे देण्यास टाळाटाळ केली, तसेच आदेशाचे पालन केले नाही.वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. आदेशाचे पालन होत नसल्याने वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार काळेपडळ पोलिसांकडून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरे तपास करत आहेत.












