पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्ही.व्ही.आय.पी. बंदोबस्तादरम्यान अल्पवयीन मुलाकडून भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा प्रकार कदमवाकवस्ती (ता.हवेली) परिसरात शुक्रवारी (ता.30) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अल्पवयीन वाहनचालकासह वाहन मालक, नातेवाईक व वाहनातील सहप्रवासी अशा तिघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य तुकाराम कांचन (वय 38, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन), वाहनातील सहप्रवासी युनूस गनी शेख (वय 35, धंदा ड्रायव्हर, रा. वाकवस्ती, हवेली) व 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील एच.पी.सी.एल. डेपो परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार किरण सुखदेव गायकवाड हे व्ही.व्ही.आय.पी. साठी बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत होते.
यावेळी सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची टोयोटा इनोव्हा (क्रमांक MH12 YX 3399) अचानक पंक्चर पॉईंटवरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालली होती.इनोव्हा कार हा अल्पवयीन मुलगा कोणताही वैध वाहन परवाना नसताना चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदरकार वाहन चालविल्याने इतर वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, सदर मुलाकडे वाहन चालविण्यासाठी परवानगी दिल्याप्रकरणी त्याचा मामा अजिंक्य तुकाराम कांचन, वाहनचालक युनूस गनी शेख व अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 281, 125, 3(5) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप जोगदंड करत आहेत.












