पुणे – नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दिलेला दबाव आणि गोमांस भक्षणाची केलेली सक्ती, हे प्रकार म्हणजे एका मोठ्या ‘कॉर्पोरेट जिहाद’चे भीषण स्वरूप आहे. हे विखारी जाळे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबई आणि पुण्यातील आयटी कंपन्यांमध्येही पसरल्याची दाट शक्यता आहे. या संघटित गुन्हेगारीचा आणि धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्यांकरिता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहीद हेमंत करकरे चौक, फिनिक्स मॉलजवळ, विमान नगर कॉर्नर, नगर रोड, पुणे येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले.
या वेळी आंदोलनात बहुसंख्येने धर्माभिमानी सहभागी झाले होते. तसेच या वेळी विविध मागण्याचे निवेदन सिद्ध करून धर्माभिमान्यांच्या सह्या घेण्यात आल्या. सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सांगितले.
आंदोलनामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्री. सर्वेश मेहेंदळे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि समाज प्रबोधनकार श्री. सुशांत गाडे, बार असोसिएशन पुणे न्यायालयचे सदस्य अधिवक्ता श्री. राहुल कदम, हिंदू जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. दत्तात्रय चोरघे महाराज तसेच विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना या विषयातील गंभीरतेवर मार्गदर्शन केले.
नाशिक येथील सदर कंपनीतून 7 आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये 7 सापडले, तर अन्य शहरात किती असतील ? ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. या आणि अशा स्वरूपाच्या अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने या वेळी दिला आहे.












