वाई तालुक्यात गोमाता सन्मान अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून, गोमातेस राष्ट्रमाता दर्जा व देशभर गोहत्याबंदी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले. सुमारे ११०० नागरिकांच्या सह्यांसह हे निवेदन देण्यात आल्याने अभियानाला अधिक बळ मिळाले आहे.
देशभर संत, महंत व साधू-संत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गोमाता ही भारतीय सनातन संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. केंद्र सरकारने तातडीने गोमातेस राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे तसेच गोहत्या व गोवंश हत्या बंदी कायदा देशभर कठोरपणे लागू करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
तहसीलदारांमार्फत ही मागणी राज्य सरकारकडे व पुढे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती करण्यात आली. तसेच गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक संरक्षण देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी श्री. काशिनाथ शेलार, संदीप घोरपडे, चंद्रशेखर घोणे, सौ. सुनंदा कट्टे, डॉ. शस्मिता जैन, गौरव देशपांडे, अक्षय आरडे, श्री. पानसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रती महामहिम राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, महामहिम राज्यपाल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.











