वाई, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने सर्वोदय सेवा ट्रस्ट, वाई (जि. सातारा) यांच्या वतीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा २०२६’ हा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम जुनी महात्मा फुले भाजी मंडई, वाई येथे सायंकाळी उत्साहात पार पडला. सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव, सुगम संध्या आणि प्रबोधनात्मक व्याख्यान यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत होते. प्रमुख उपस्थितीत बापूसाहेब शिंदे (लोकनेते व सदस्य, जि.प. सातारा), आनंद (बाळासाहेब) चिरगुटे (समाजसेवक), नगरसेवक भारत दादा खामकर, विजय ढेकाणे, काशिनाथ शेलार, समाजसेविका लक्ष्मीताई कळबे तसेच जीवन विद्या मिशनच्या अध्यक्षा स्वाती मांढरे यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वाई तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार धनंजय घोडके, पांडुरंग भिलारे, विकास जाधव, प्रशांत थोरवे, संजीव महामुनी, सारिका गवते व गजानन जाधव उपस्थित होते.
सर्वोदय सेवा ट्रस्ट ही सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य, राजकारण विरहित सामाजिक संस्था असून वर्षभर विविध उपक्रम राबवित असते. यामध्ये वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे, गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळे, विविध आपत्तीमध्ये आर्थिक मदत, वधूवर सूचक केंद्राचे संचालन, समाजप्रबोधन उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन अशा अनेक सामाजिक कार्यांचा समावेश आहे. या सातत्यपूर्ण कार्यामुळे संस्थेने सातारा जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमात ‘गाथा महाराष्ट्राची’ या विषयावर प्रख्यात व्याख्याते मा. श्री. दशरथ शिरसाठ (मुंबई) यांचे प्रभावी व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या ओघवत्या आणि विचारप्रवर्तक शैलीतून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रनिष्ठा यांचा वेध घेत उपस्थितांना प्रेरित केले. त्यांच्या प्रबोधनाने सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
अध्यक्षीय मनोगतात अनिल सावंत यांनी कृष्णा सेवा कार्य फाउंडेशन, वाई यांच्या नदी स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले. तसेच वाई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या नगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांविषयी अभिमान व्यक्त करत, “या दोन्ही घटकांचा गौरव करण्याचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी आनंदाची आणि कायम स्मरणात राहणारी बाब आहे,” असे सांगितले.
यावेळी सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशन, वाई तसेच वाई नगरपालिकेतील आदर्श चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष वाडकर व वैशाली वाडकर यांनी सुरेखरीत्या केले, तर आभार प्रदर्शन आनंद गायकवाड यांनी मानले. या यशस्वी कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे, सचिव संतोष वाडकर, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर व खजिनदार ज्ञानदेव वाशिवले तसेच संस्थेचे सर्व संचालक सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि कर्तृत्वाचा गौरव यांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात ठसा उमटवून गेला.











