घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भारतीय इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्व: पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर

भारतीय इतिहासात अनेक महापुरुष व कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या. त्यांनी आपल्या जीवन व कार्यातून जनतेचे राज्य निर्माण केले. समाजासमोर आदर्श निर्माण केला. जनमानसांच्या मनात नैतिकतेचा ठसा उमठवला. त्यापैकीच एक अग्रगण्य नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांनी प्रजेला आईसमान दर्जा देत अनेक लोककल्याणकारी कामे केली. त्यामुळे जनतेने त्यांना ‘ पुण्यश्लोक’ ही उपाधी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांचे महान कार्य समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने आपण सर्वत्र त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी येथे झाला. त्यांचे वडील गावचे पाटील होते. त्यांना घरातूनच उत्तम संस्कार मिळाले. पुढे त्यांचा विवाह मराठा साम्राज्यातील होळकर घराण्याचे राजपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. पती खंडेराव होळकर व सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्या मालवा (इंदूर) साम्राज्याच्या प्रमुख शासक बनवल्या. त्यांनी होळकर संस्थानाचे रक्षण करत राजधानी महेश्वर येथून अनेक लोककल्याणकारी कामे केली. तत्कालीन परिस्थिती पाहता स्त्रियांना राज्यकारभार चालवणे खूपच आव्हानात्मक होते. असे असताना देखील अहिल्यादेवी होळकर यांनी धैर्य, बुद्धिमत्ता व समानतेच्या तत्त्वावर होळकर संस्थानाचा राज्यकारभार यशस्वीपणे चालविला.
अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वांना समतेची वागणूक दिली, जात, धर्म वंशभेद मानला नाही, दुष्काळ तसेच संकटाच्या काळात गरीब जनतेस सर्वतोपरी मदत केली, महिलांचा योग्य सन्मान केला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावोगावी तसेच रस्त्याच्या कडेला अनेक विहिरी, तलाव व पानवठे बांधले, अनेक मंदिरे तसेच धर्मशाळा उभारल्या. काशी येथील जगप्रसिद्ध विश्वनाथ व सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीसाठी मोठे योगदान दिले.
अहिल्यादेवी होळकर या अत्यंत कुशल प्रशासक होत्या, राजा हा प्रजेचा सेवक असतो ही त्यांची धारणा होती. त्यांचे नेतृत्व हे लोकाभिमुख होते. त्यांनी प्रजेला आपले कुटुंब मानले. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, प्रशासन चालवण्याचे कौशल्य होते. संस्थानाच्या प्रमुख असताना देखील अहिल्यादेवी होळकर यांनी साधेपणा जपला. त्या मनाने दयाळू होत्या. जीवनात अहंकार न बाळगता लोकसेवेला महत्त्व दिले. गोरगरीब लोकांच्या त्या तारणहार बनल्या. जनतेच्या तक्रारी त्या स्वतः ऐकत व निष्पक्षपणे न्यायदान करत. त्यांच्या काळात शेतकरी, मजूर महिला व दुर्बल घटक सुखी होते. यामुळे समस्त प्रजा त्यांना ‘लोकमाता’ म्हणत. त्यांनी अखंडपणे २९ वर्षे आदर्श राज्यकारभार केला.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व कार्य आज देखील समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे स्त्रीशक्ती व आदर्श नेतृत्वाचा सन्मान करणे आहे. आपण त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत. या पवित्र दिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन!

प्रा. डॉ. अंबादास सकट
इंग्रजी विभाग
किसन वीर महाविद्यालय, वाई

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें